पंढरपूर कॉरीडॉरला स्थानिकांकडून तीव्र विरोध
पंढरपूर,दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्याचा धडाका लावला आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच वाराणसी आणि उज्जैन प्रमाणे पंढरपूर कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे. मात्र या उपक्रमांला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.Strong opposition from locals to Pandharpur Corridor
या कामासाठी मंदिर परिसरातील तीनशे घरे आणि दोनशे दुकाने पाडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येथील नागरिक आणि व्यापारी धास्तावलेत. त्यांनी या कॉरिडॉरला विरोध सुरू केलाय. प्रशासनाने याबाबत हरकती, सूचना मागवल्या. विकास आराखडा तयार केला. मात्र, या साऱ्या कामात आम्हाला विश्वासात घेतलेले नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या उपक्रमा विरोधात पंढरपूर बचाव समितीने आंदोलन केले आहे.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा केलेल्या पंढरपूर विकासाच्या घोषणे नुसार या उपक्रमासाठी तीनशे कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोघेही खर्च करणार आहेत. या कॉरिडॉरद्वारे पंढरपुरातल्या गल्ल्या, रस्ते, घाट, मठ, मंदिरे, पालखी मार्ग, चंद्रभागा तीराचा विकास करण्याचे नियोजन आहे.
पंढरपूर कॉरिडॉरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागवण्यात आलेल्या 1500 कोटी रुपयांची निविदा भरण्यासाठी उद्या अंतिम मुदत आहे. टाटा कंपनी सह अनेक बड्या कंपन्या या निविदा भरण्यास उत्सुक आहेत. मात्र मंदीर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाविरोधात काळे फलक लावून निषेध मोहिम उघडली आहे.
दरम्यान आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर येणाऱ्या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्नाटकाने महाराष्ट्रातील 40 गावांवर अधिकार सांगितला असताना पंढरपूरमध्ये छेडले गेलेल्या या आंदोलनाची राज्य सरकार गंभीरपणे दखल घेईल अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे.
SL/KA/SL
25 Nov. 2022