मंगळवारपासून ६ हजार आरोग्य सेविकांचे कामबंद आंदोलन
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका व 2 हजार म्युनिसिपल आशा सेविका अशा एकूण सहा हजार आरोग्य सेविका मंगळवार 11 जून पासून कामबंद आंदोलन करणार आहे. यासाठी उद्या पासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व म्युनिसिपल आशा सेविका युनियन चे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास व सरचिटणीस अॅड. विदुला पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ॲड. प्रकाश देवदास म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 2015 पासून किमान वेतन देण्यात यावे. न्यायालयाने भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन देण्याचे आदेश दिले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी, आरोग्य सेविकांना प्रसूती विषयी कायद्याचे फायदे देण्यात यावे, कोणतेही अतिरिक्त काम ज्यामध्ये मानधन दिले जाते त्याबाबत संघटनेशी करार केल्याशिवाय काम जबरदस्ती लादू नये, आरोग्य सेविकांना वेंडर केले आहे ते रद्द करावे, सन 2016 पासून नेमणूक झालेल्या आरोग्य सेविकांना सहा महिन्याने देण्यात येणारा सेवा खंड बंद करण्यात यावा, अतिरिक्त कामासाठी किमान वेतन अधिनियमातील तरतुदीनुसार अधिक भत्त्याच्या आधारे म्हणजे दुपटीने मोबदला देण्यात यावा, ज्या आरोग्य सेविकांना सर्वेचे काम करणे शक्य नाही त्यांना हे काम देण्यात येऊ नये, गटविमा योजना लागू करण्यात यावी किंवा वार्षिक विम्याचा हप्ता 15 हजार रुपये देण्यात यावा. तसेच महापालिका आशा सेविकांना पगार 6 हजार रुपये देण्यात यावा, महापालिका आशा सेविकांचा पगार दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेमध्ये देण्यात यावा, आरोग्य सेविकांच्या रिक्त झालेल्या जागेवर महापालिका आशासेविकांना आरोग्य सेविका म्हणून सामावून घेण्यात यावे, अतिरिक्त कामासाठी किमान वेतन अधिनियमातील तरतुदीनुसार अतिकालीक भत्याच्या आधारे म्हणजे दुप्पटीने मोबदला देण्यात यावे असे अॅड. प्रकाश देवदास अध्यक्ष तसेच अॅड. विदुला पाटील सरचिटणीस यांनी सांगितले.
यासाठी उद्या आझाद मैदानात आरोग्य सेविका व आशा सेविका या हजारोंच्या संख्येने धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाने मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.असा इशारा मुंबई महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व म्युनिसिपल आशा सेविका युनियनतर्फे देण्यात आला आहे.
SW/ML/SL
10 June 2024