चीनकडून फंडींग घेतल्याच्या आरोपावरून ‘न्यूज क्लिक’वर कडक कारवाई
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिनी फंडिंगच्या आरोपांमुळे न्यूज क्लिक या न्यूजपोर्टलवर आज सकाळपासून दिल्ली पोलिस कडक कारवाई करत आहेत. 100 पोलिसांची टीम जवळपास 8 ते 9 पत्रकारांच्या वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेतला. न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाची धाड पडली आहे. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मींच्या घरी धाड टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात दुपारपर्यंत अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दिल्ली पोलिसांनी मध्यरात्रीच यासाठी एक विशेष मीटिंग घेऊन कारवाई केल्याचं म्हटलं जातंय. ‘न्यूजक्लिक’ विरोधात दहशतवादविरोधी यूएपीए कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे.
आज पहाटे सहा वाजल्यापासूनच या कारवाईला सुरुवात झाली. जवळपास 38 कोटींच फंडिंग चीनकडून आल्याचा आरोप केला आहे.दरम्यान ऑगस्टमध्येच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता. 5 ऑगस्ट 2023 रोजी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात न्यूजक्लिक ला चीनी फंडींग मिळत असल्याबाबत एक बातमी प्रकाशित झाली होती. याआधी 2021 मध्येही न्यूजक्लिकच्या कार्यालवर आयकर खात्यानं अवैध फंडिगबाबत धाडी टाकल्याच होत्या
आज कारवाई करताना दिल्ली पोलीसांनी या प्रकरणात आरोपींची ए, बी, सी अशी वर्गवारीही केली. काहींना लोधी रोड पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावलं गेलं, तर काहींची घरातच चौकशी करण्यात आली आहे. ज्या 25 प्रश्नांची यादी चौकशीसाठी तयार केली गेली. त्यात शेतकरी आंदोलन, शाहीनबाग आंदोलन, ईशान्येतल्या आंदोलनाबाबतचेही प्रश्न असल्याची सूत्रांची माहिती आहे. देशातल्या अनेक पत्रकार संघटनांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
SL/KA/SL
3 Oct. 2023