अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण, मच्छिमार नौका देवगड बंदरात आश्रयाला
सिंधुदुर्ग दि २५ – अरबी समुद्रात सध्या वादळसदृश वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. समुद्रात उधाणाची स्थिती असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या इशाऱ्यानंतर शेकडो मच्छीमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत .स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकांचा यात समावेश आहे. दोन दिवस वादळसदृश वातावरण असल्याने मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. समुद्रातील साहसी खेळांना देखील बंदी घालण्यात आल्यामुळे सुट्टी घालवण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.