पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली
मुंबई, दि. १३ :
५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे ब्रॅण्ड ने दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच. कदाचित आपल्या स्मृतीपटलावर ही महत्त्वाची गोष्ट राहिलेली दिसत नाही, अशा सुस्पष्ट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या प्रचार सभेत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाच्या संभ्रमित करणाऱ्या प्रचाराला मुंहतोड जवाब शिवसेनेच्या वक्त्यांनी दिला.
विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, उदेश पाटेकर, विलास पोतनीस, शुभदा शिंदे, रेखा बोऱ्हाडे, नयन कदम, चेतन कदम, शशीकांत झोरे, मिलिंद साटम, रोहिणी चौगुले, नंदकुमार मोरे, अभिलाष कोंडविलकर, वनीता दळवी, सचिन पाटील, माधुरी खानविलकर, कुणाल माईणकर, करण मेनन आदी वक्त्यांनी घणाघाती तोफ डागतांना सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हल्ली देवाभाऊ संभ्रमित झाल्यासारखे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकच ब्रॅण्ड असल्याचे सांगतांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वर टीका करुन ठाकरे बंधू ब्रॅण्ड नसल्याचे बोलत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर खरे ब्रॅण्ड आहेतच परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती पक्षप्रमुख या नात्याने शिवसेनेची धुरा आली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष १२३ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती झुंज देत ६३ जागा जिंकल्या. देवेंद्र फडणवीस यांचे अल्पमतातील सरकार शरद पवार यांच्या अदृष्य हाताने १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ या काळात वाचविले.
त्यामुळे अस्वस्थ झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी २२ वर्षात जेवढी बदनामी झाली नाही तेवढी २२ दिवसांत सहन करावी लागली, असे सांगून आपली खुर्ची स्थिर ठेवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना मातोश्रीवर पाठवून उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठिंब्यासाठी याचना केली. मोठ्या मनाने उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार टिकले. या गोष्टी पद्धतशीरपणे विस्मृतीत गेलेल्या दिसतात. म्हणूनच देवाभाऊंची सेना वाट्टेल ते बोलून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. मुळात या लोकांना शिवसेनेचा इतिहास नव्याने सांगावा लागणार आहे.
शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही, असा आपल्या सोयीचा व्हिडिओ दाखवणाऱ्यांना मुद्दाम सांगावेसे वाटते की, १३ ऑगस्ट १९६० रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या मार्मिक या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले होते. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली त्यानंतर १९६७ रोजी हटाव लुंगी बजाव पुंगी असा नारा देत टी के कृष्ण मेनन यांच्या विरोधात काँग्रेसचे स. गो. बर्वे यांना इशान्य मुंबई मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला. दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यानंतर बर्वे यांच्या भगिनी ताराबाई सप्रे यांना पाठिंबा दिला. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांनाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक असतांनाही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा देत राष्ट्रपती पदावर विराजमान केले. मुरली देवरा यांना पाठिंबा देत महापौर बनविले. हे सर्व कॉंग्रेस पक्षाचे होते.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या टीकेला कोणताही अर्थ नाही, ते केवळ मतदारांना संभ्रमित करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमेदवार कुणीही असो निशाणी मशाल आणि रेल्वे इंजिन हेच लक्षात ठेवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.ML/ML/MS