महाबळेश्वर ते रत्नागिरी जोडणार अत्याधुनिक केबल-स्टे ब्रिज

मुंबई, दि. १९ : महाबळेश्वर आणि रत्नागिरी यांना थेट जोडणारा एक आधुनिक केबल-स्टे ब्रिज उभारला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवरून (Bandra-Worli Sea Link) प्रेरणा घेतलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला केबल-स्टे ब्रिज असेल. 540 मीटर लांबीचा आणि 14 मीटर रुंदीचा हा पूल असून, त्याच्या मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची एक व्ह्यू गॅलरी उभारली जात आहे. ही गॅलरी पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार असून, तेथून कोयना जलाशयाचे विहंगम दृश्य तसेच सह्याद्री पर्वतरांगेतीलसूर्योदय आणि सूर्यास्ताचे नयनरम्य देखावे पाहता येतील.
या पुलामुळे सातारा जिल्ह्यातील तापोळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गाढवली आहिर हे जोडले जाणार असून, महाबळेश्वर आणि कोकण दरम्यानचे अंतर सुमारे 50 किलोमीटरने कमी होणार आहे.
या पुलामुळे कोयना खोऱ्यातीलदुर्गम भाग जोडला जाणार असून, खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे सातारा आणि महाबळेश्वर असा प्रवास करणे शक्य होणार आहे. आता रत्नागिरीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रवाशांना पोलादपूरच्या आंबेनळी घाटाच्या लांबच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी, ते या नवीन पुलाद्वारे तापोळ्याला पोहोचू शकतील आणि कास पठारावरून (Kas Plateau) थेट साताऱ्याला जाऊ शकतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.