राज्यस्तरीय टेनिसपटूची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या

गुरुग्राम, दि. १० : गुरुग्राममधील स्टार टेनिसपटू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली. अत्यंत भयंकर बाब म्हणजे राधिकाचे वडिल दीपक यादव यांनीच तिची हत्या केली आहे. ही घटना राधिका राहत असलेल्या सुशांत लोक-2 मधील निवास्थानावर झाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरु आहे. वडील दीपक यादव यांनी वैध परवानाधारक रिव्हॉल्वरने तिला तीन गोळ्या घालून जखमी केले, ज्यामध्ये राधिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना एका सोशल मीडिया रीलवरून निर्माण झालेल्या वादामुळे घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दीपक यादव यांना राधिकाने पोस्ट केलेले रील खटकले आणि त्यामुळे त्यांच्यात वाद वाढत गेला. गुरुग्राम पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना अटक केली असून त्यांच्याकडून बंदूक सुद्धा ताब्यात घेण्यात आली ज्याने राधिकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
राधिका यादव ही एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू होती. तिने हरियाणासाठी विविध राज्यस्तरीय टेनिस स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिने गुरुग्राममध्ये स्वतःची टेनिस अकॅडमी सुरू केली होती आणि अनेक नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत होती. राधिका यादव ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) मध्ये युगल टेनिसपटू म्हणून 113 रँकिंगवर होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे स्थानिक खेळविस्तार आणि तिच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
SL/ML/SL