ठाणे पोलिसांना व्यक्तिशः हजर राहण्याचे राज्य महिला आयोगाचे निर्देश

मुंबई, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे येथील तरुणीवर जीवघेणा हल्ला प्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल अध्यक्षा यांच्या समक्ष व्यक्तिशः उपस्थित राहून सादर करण्याचे निर्देश आज राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्या मुलाने ठाण्यात मित्रांच्या मदतीने आपल्या मैत्रिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. १४ डिसेंबर २०२३ रोजी पीडित तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्ट द्वारे तिच्यावरील हल्ल्याची घटना उघडकीस आली होती.
सदर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत १५ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे पोलिसांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आयोगाच्या निर्देशानंतर ठाणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या तरुणीची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.
आता पोलिसांनी गेल्या आठ दिवसात या प्रकरणी केलेल्या तपासाबाबत व्यक्तिशः उपस्थित राहून अहवाल सादर करावा असे निर्देश आयोगाने दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कासारवडवली यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी यांचेसह वस्तुनिष्ठ अहवाल २२ डिसेंबर २०२३ रोजी दु. ३ वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात अध्यक्षा यांच्या समक्ष उपस्थित राहून सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
ML/KA/SL
21 Dec. 2023