युद्धकला आणि मर्दानी खेळ राज्यस्तरीय स्पर्धाना प्रारंभ
कोल्हापूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर युद्ध कला आणि मर्दानी
खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.हलगीचा कडकडाट, कैताळचा गजर आणि तुतारीचा निनाद, अंगावर शहारे आणणारी आणि एकाच जागेवर खिळवून ठेवणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा भारावलेल्या
वातावरणात इथे युद्ध कला आणि मर्दानी खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्र पूजनाने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
या स्पर्धेत कोल्हापूर पुणे, मुंबईसह महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील ७०० स्पर्धक आणि ३३ मर्दानी खेळांचे आखाडे सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवांतर्गत युद्ध कला आणि मर्दानी खेळ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथमच राज्यस्तरावर खास युद्ध कला आणि मर्दानी खेळांची स्पर्धा कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे युद्ध कला आणि मर्दानी खेळ प्रेमींना ही पर्वणीच लाभली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत स्पर्धकांनी
एक हाती चक्र, कसरत उडी, भाला,दांडपट्यावरून उडी, आदी युद्धकला प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या
डोळ्याचे पारणे फिटले. मर्दानी खेळ स्पर्धकाने चक्राची प्रात्यक्षिके सादर करताना ते हवेत भिरकावले.
भालाफेकची प्रात्यक्षिके सादर करताना स्पर्धकाने एका हातावर उडी मारून थरारक प्रात्यक्षिके सादर केली.एकाच वेळी सहभागी खेळाडूंनी काठी, पट्टा, तलवारबाजी, भाला, माडू, विटा, कुर्हाड, जबरदंड, बाणा,गुर्ज, चक्र, दांडपट्टा फेक आदी चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले.
हे पाहताना उपस्थितांचे डोळ्याची पापणी हलते ना हलते इतक्या कमी वेळात अनेकांनी दांडपट्टा उडी, अंगावरून दुसऱ्याला मागे टाकणे,चक्र फिरवणे आदींची डोळ्याची पारणे फेडणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून वाहवा मिळवली. यावेळी सहभागी झालेल्या एका संघाच्या स्पर्धकाने लाठीकाठी फिरवून उपस्थितांची मने जिंकली.
हे पाहून पालकमंत्री मुश्रीफ यांनीही लाठीकाठी फिरविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी फिरवून आनंद लुटला.
ML/KA/SL
21 Oct. 2023