सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती

नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चैत्री नवरात्री उत्सवानिमित्त देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. भाविकांची अलोट गर्दी झाल्याने गर्दीचे नियोजन ढासळले. त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रशासन आणि पोलिस व्यवस्थेची मोठी तारांबळ उडाली.
दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शन मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी लहान मुले, वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागला. गर्दीचे नियोजन न झाल्याने भाविकांनी पोलिस आणि सप्तशृंग गड व्यवस्थापन विरोधात नाराजी व्यक्त केली.
या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची एक रांग आणि दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची दुसरी रांग करणे आवश्यक होतं. तसेच बाजूच्या दुकानांच्या गर्दीसाठीही वेगळे नियोजन करणे आवश्यक होतं. पण तसं काहीच झालं नसल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे.
SL/ML/SL
10 March 2025