एक कोटीच्या पॉलिसीसाठी रचला स्वतःच्याच खुनाचा बनाव

 एक कोटीच्या पॉलिसीसाठी रचला स्वतःच्याच खुनाचा बनाव

लातुर, दि. 16 : लातूरमध्ये घडलेली ही घटना थरारपटालाही मागे टाकणारी आहे. एका बँक रिकव्हरी एजंटने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा कंपनीकडून तब्बल एक कोटी रुपयांचा लाभ मिळवण्याचा डाव आखला. आरोपीचे नाव गणेश चव्हाण असून, त्याने आखलेली ही योजना पोलिसांच्या चातुर्यामुळे पूर्णपणे फसली. रविवारी सकाळी औसा तालुक्यात वनवाडा रोडवर एक कार भीषण आगीत जळून खाक झाली. कारमध्ये एक मृतदेह सापडला आणि सुरुवातीला सर्वांना वाटले की तो गणेश चव्हाणचाच आहे. कारण कार त्याच्याच ताब्यात होती. कुटुंबीयांनीही अपघात मानून शोक व्यक्त केला. पण खरी कहाणी वेगळी होती.

तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. गणेशने घटनेनंतर आपल्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या फोन नंबरवरून मेसेज पाठवले होते. यामुळे पोलिसांना संशय आला. चौकशीत समजले की मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा होता आणि गणेश जिवंत होता.

पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अखेर कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे गणेश चव्हाण जिवंत अवस्थेत सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने कबूल केले की त्याने एक कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी घेतली होती. गृहकर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती आणि म्हणूनच त्याने स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचले.

या कटात त्याने गोविंद यादव नावाच्या एका अनोळखी व्यक्तीला बळी बनवले. औसा येथील तुळजापूर टी-जंक्शनवर यादव नशेत होता. गणेशने त्याला लिफ्ट दिली. गाडीत यादव बेशुद्ध पडल्यावर गणेशने त्याला ड्रायव्हरच्या सीटवर बसवले, सीटबेल्ट लावला, माचिसच्या काड्या व प्लास्टिकच्या पिशव्या ठेवून गाडीला आग लावली. ओळख पटावी म्हणून स्वतःचे ब्रेसलेटही त्याच्याजवळ ठेवले.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, हा प्रकार अत्यंत थरारक होता. सुरुवातीला मृतदेह गणेशचाच असल्याचा भास निर्माण झाला होता. पण तपास जसजसा पुढे गेला, तसतसे सत्य उघडकीस आले. सध्या गणेश चव्हाणवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बनावट मृत्यूच्या कटामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *