दिवाळीत 10 टक्क्यांनी महागणार एसटीचे तिकीट

मुंबई, दि. ३० : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या तिकिटांमध्ये 10 टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार असून, गावी जाण्याचा प्रवास आता अधिक महाग होणार आहे.
ही भाडेवाढ सर्व प्रकारच्या एसटी बसेससाठी लागू होणार नाही. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई या खास बससेवा वगळता इतर सर्वसाधारण, लांब पल्ल्याच्या, रातराणी आणि ग्रामीण भागातील बसेससाठी ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
महामंडळाने ही दरवाढ गर्दीच्या काळात महसूल वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त फेऱ्या चालवण्यासाठी घेतली आहे. दिवाळीच्या काळात बसस्थानकांवर मोठी गर्दी उसळते, प्रवाशांना सीट मिळवण्यासाठी झुंबड उडते. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी एसटीकडून अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षीही एसटी महामंडळाने 14.95 टक्के दरवाढ केली होती, जी जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली होती. यंदा पुन्हा दिवाळीच्या निमित्ताने दरवाढ झाल्यामुळे प्रवाशांना अधिक खर्च करावा लागणार आहे. एसटीचा प्रवास आजही सुरक्षित आणि विश्वासार्ह मानला जातो, मात्र दरवाढीमुळे “लाल परी”चा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागडा ठरणार आहे.
SL/ML/SL
30 Sept. 2025