रायगडावरील श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर ही दोन वेगळी मंदिरे
पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना ती दोन स्वतंत्र मंदिरे असल्याचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरे असल्याचे दिसून आले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर केले. यावेळी ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडूरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम यावेळी उपस्थित होते.
राज मेमाणे म्हणाले, रायगडावरील महादेवाचे मंदिर त्याच्या तटबंदीवर असलेल्या शिलालेखातील मजकुरावरून श्री जगदीश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. पुणे पुरालेखागारातील पेशवेकालीन मोडी कागदपत्रांतून रायगडावर श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर होते आणि त्याचा जीर्णोद्धार इसवी सन १७८२ साली केला असा उल्लेख येतो. त्यावरून ज्येष्ठ इतिहास संशोधक श.ना. जोशी यांनी त्यावेळेस उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतील मजकुरावरून असा तर्क मांडला होता की, रायगडावरील महादेवाचे शिवकालीन मूळ नाव वाडेश्वर असावे आणि प्रस्तुत शिलालेखात गौरवार्थ म्हणून काव्यात त्याला जगदीश्वर म्हटले गेले असावे.
परंतु पुणे पुरालेखागारातील रायगडच्याच मोडी कागदपत्रांतून वाडेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार केलेल्या बांधकामाचा इसवी सन १७८२ सालातील मूळ, अस्सल, अप्रकाशित आणि बांधकामाचा विस्तृत तपशील सांगणारा एकूण ११ मोडी कागदपत्रांचा संच सापडला असून त्यात श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर कुशावर्त तळ्यावर होते असा स्पष्ट उल्लेख येतो. सदर संचातील कागदाचे शीर्षक असे की, ” देऊळ श्री वाडेश्वर महादेव कुशावर्त तळयावरील जुनी जीवरखी (गाभारा) होती. लागवड खर्च करून देवाची स्थापना केली. त्यास देऊळ बांधावयास खर्च जाहला. तो नख्त रुये ९९ रुपये ४ आणे तीन पैसे. याशिवाय मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य, बांधकाम करणाऱ्या लोकांची नावे त्यांचे कामाचे दिवस, इत्यादी बारीक सारीक तपशील पाहायला मिळतो. या संशोधनामुळे रायगडावरील जगदिश्वर महादेव हेच श्री वाडेश्वर महादेव नसून हि दोन वेगळी मंदिरे असून वाडेश्वर महादेवाची कुशावर्त तळ्यावरील स्थान निश्चिती करता येते, अशी माहिती राज मेमाणे यांनी दिली. हे संशोधन सादर करण्यासाठी त्यांना मंदार लवाटे, शिवराम कार्लेकर, विशाल खुळे , कौस्तुभ कस्तुरे, प्रसाद दांगट यांनी सहकार्य केले.
ML/ML/SL
29 Dec. 2024