स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उंच माझा झोका, लोकमान्य यांसारख्या मालिकांमधुन घरोघरी पोहोचलेली सोज्वळ गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी आता पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर झळकणार आहे.या मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्पृहा महत्त्वाच्या भूमिकेत असणारी ही आगामी मालिका म्हणजे “सुख कळले.” कलर्स मराठी वाहिनीवर ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच स्पृहा बरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुख असणार आहे.
“सुख कळले” ही मालिका कधी सुरु होणार, हे अद्याप उघड झालेले नाही तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला आहे. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना तुफान भावते आहे.
“सुख कळले” मालिकेच्या प्रोमोमध्ये स्पृहा जोशी ही एका रिक्षामधून उतरते. तिच्यासोबत सागर देशमुख असतो. दोघेही रमतगमत चालत असताना अचानक स्पृहाची चप्पल तुटते. सागर त्याच्या पायातली चप्पल काढून स्पृहाला घालायला देतो आणि तिच्या चप्पल एका हातात घेतो. स्पृहा सागरच्या खांद्यावरची बॅग घेते. एकंदरीत स्पृहा आणि सागरचा सुखी संसार “सुख कळले” या मालिकेत दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या मालिकेच्या प्रोमोची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
SL/ML/SL
12 March 2024