ऑलिम्पिक विजेत्या या खेळाडूंनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर (Manu Bhaker) यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारने नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही हे सरकारी काम करण्यास नकार दिला आहे. सरबज्योत सिंग आणि मनू भाकरने नोकरीची ऑफर न स्वीकारण्याचे कारणही दिले आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी सरकारी नोकरी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोघांचं म्हणणं आहे की ते नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळत आहे. दरम्यान, मनू भाकर आणि सबरज्योत सिंग यांना क्रीडा विभागात उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती.
ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने 30 लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची आज भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल खूप आभार. त्यांच्या अविरत प्रयत्नांनी देशाचे खेळाडू आणखी उंच शिखरावर पोहोचतील अशी मला खात्री आहे, असे मनू भाकरने सोशल मीडियावर ट्विट करत म्हटलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे.
पदकतालिकेवर नजर टाकली तर चीन अव्वल आहे. चीनने एकूण 90 पदके जिंकली आहेत. त्यात 39 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक आहेत. सुवर्णपदक जास्त जिंकल्याने चीन पहिल्या क्रमांकावर आहे. यूएसए दुसऱ्या स्थानावर आहे. यूएसएने 38 सुवर्णांसह 122 पदके जिंकली आहेत. त्यात 42 रौप्य आणि 42 कांस्य पदकांचा समावेश आहे.
SL/ML/SL
11 August 2024