काळाचौकी दत्ताराम लाड मार्गावर स्पीड ब्रेकर बसवा

मुंबई, दि 28
काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गांवर वेगवान वाहनांच्या गतीला आळा बसविण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
अटल सेतू झाल्याने या मार्गांवर मोठ्या डंपर, ट्रक यांची वर्दळ जास्त झाली आहे. पूर्वी या मार्गांवर स्पीड ब्रेकर होते. मात्र नवीन रस्ता करताना ते उखडून टाकण्यात आले. नवीन रस्ता होऊन आज कित्येक महिने झाले मात्र रस्त्यावर स्पीड ब्रेकर अजूनही पडलेला नाही. या
रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, शाळेतील विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या महिला, पुरुष यांची वर्दळ सुरु असते. वाहनांचा वेग इतका असतो की रस्ता ओलांडणे देखील जिकरीचे झाले आहे.
एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. तसेच अटल सेतूवरुन जाणारी वाहने दत्ताराम लाड मार्गावरून न वळवता शोभा हॉटेल येथून वळवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. आम्ही याबाबत वारंवार वाहतूक विभागाकडे स्पीड बेकर बसवण्यासाठी विनंती करत आहोत परंतु अजूनही या ठिकाणी स्पीड बेकर बसवण्यासाठी प्रशासन जागे झाले नाही. तरी या ठिकाणी त्वरित स्पीड ब्रेकर बसवावा. जेणेकरून अपघात होणार नाही अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी दिला आहे.