दिल्ली मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून विशेष ट्रेन

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली दरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. ही विशेष रेल्वे उद्या बुधवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे १९ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत
हे संमेलन होत आहे. या पुणे ते दिल्ली प्रवासात रेल्वे डब्यात ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.
या विशेष रेल्वेला १६ डब्बे असणार असून डब्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ सहभागी होत आहेत. ते या रेल्वेद्वारे प्रवास करणार करणार आहेत आणि साहित्यिक, कलावंतांशी ते संवाद साधणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ.संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवासा दरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
SL/ML/SL18 Feb. 2025