कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेचे 26 फेब्रुवारी पर्यंत विशेष नियोजन…

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाकुंभ दरम्यान स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भाविक जात आहेत. त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासना तर्फे नागपूर-दानापूर-नागपूर मार्गावर 12 विशेष रेल्वेगाड्या चालविल्यानंतर ही आता पुन्हा प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 26 फेब्रुवारी पर्यंत विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर-दानापूर दरम्यान आणखी काही विशेष गाड्या चालविल्या जाणार आहे. रेल्वे गाडीत आरक्षित डब्ब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे तिकीट काढून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी आता मध्य रेल्वे तर्फे आजपासून कुंभमेळा विशेष गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली आहे.
14 जानेवारी पासून आतापर्यंत नागपूर रेल्वे स्थानकातून जवळपास साडे आठ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून 26 फेब्रुवारी पर्यंत ही संख्या दुप्पट होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. रविवारी प्रयागराज येथून 330 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर सोमवारी 191 रेल्वेगाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे.
ML/ML/SL
11 Feb. 2025