मुंबई अग्निशमन दलाकडून ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ अंतर्गत ९०७ आस्थापनांची तपासणी
मुंबई प्रतिनिधी
नववर्ष निमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बार आदी आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कसून तपासणी केली जात आहे. दिनांक २२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अग्निसुरक्षेशी संबंधित अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या ४१ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली. तर, १६ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मुंबईतील विविध हॉटेल्स, पब, बार, गृहसंकुल व इमारती, समुद्रकिनारा आदी ठिकाणी विविध कार्यक्रम व स्वागत सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ डिसेंबर २०२५ ते दिनांक २८ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्तींचे अनुपालन केले नसल्याचे आढळून आल्यास, त्यांच्यावर ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’ च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक २५ डिसेंबर २०२५ पर्यंत १० मॉल्स, २५ पंचतारांकित हॉटेल्स, ५९ लॉजिंग-बोर्डिंग, १९ रूफ टॉप, १४८ पब, बार, क्लब, १२ पार्टी हॉल, ५ जिमखाना, ६२८ रेस्टॉरंट आदी मिळून एकूण ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या ४१ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तर, १६ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या.
दरम्यान, दिनांक २८ डिसेंबर २०२५ पर्यंत या ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ अंतर्गत विविध आस्थापनांची तपासणी सुरू राहील. त्यानंतरही मुंबई अग्निशमन विभागाच्या वतीने नियमितपणे कारवाई केली जाईल.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून केले आहे.