रेबिजमुक्तीसाठी मुंबई मनपाची विशेष मोहिम

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.मुंबई महापालिकेकडून भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे उद्भवणाऱ्या रेबीज संक्रमणाचा धोका कमी करणे आणि श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवणे या उद्देशाने पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’अंतर्गत भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत विविध संस्थांच्या सहाय्याने मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मार्च २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३पासून आतापर्यंत सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.
भटक्या श्वानांच्या लसीकरणातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषत: रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे आणि त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राण्यांचे कल्याण साधणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आदी उद्दिष्टे महत्त्वाची आहेत.
मार्च २०२४च्या अखेरपर्यंत ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने यासाठी चार संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांमधील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सहाय्याने हे लसीकरण करण्यात येणार आहे.
सप्टेंबर २०२३पासून पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान अविरतपणे सुरू आहे.
SL/KA/SL
18 Feb. 2024