सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात…

वाशीम दि १४:– वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक मोठ्या संकटात आले आहे. सध्या सोयाबीन पीक ऐन शेंगधरणा अवस्थेत असताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पिवळसर होऊन जमिनीवर पडल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिकाला दीड ते दोन आठवडे कोरड्या हवामानाची गरज असते. मात्र, जिल्ह्यात सलग पावसामुळे पिकांची मुळे सतत पाण्यात बुडाल्याने शेंगधरणीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर थेट परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असून, अनेक शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. परंतु पिके पिवळे पडून शेंगा नीट धरणार नाहीत, अशी भीती निर्माण झाली आहे. जर पाऊस असेच सुरू राहिला तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कुठेतरी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक पॅकेज तातडीने जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.ML/ML/MS