महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. 06 फेब्रुवारी 2025 अखेर 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 मे.टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
खरेदी केलेला सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या 345 गोदामात तसेच भाडेतत्वावरील 252 खाजगी गोदामात साठवणूक करण्यात आला आहे. मात्र या हंगामात सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सदर गोदामांची साठवणूक क्षमता देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने सन 2024-25 करीता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 4892 रुपये इतका हमीभाव घोषित केला असून तो मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 रुपये प्रति क्विंटल इतका जास्त आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सीअंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीमार्फत शेतकरी नोंदणी तथा खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यासाठी नाफेडद्वारे 403 आणि एनसीसीएफद्वारे 159 अशी एकूण 562 केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली.
सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात येऊन दि.15 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 90 दिवसांची मुदत दि.12 जानेवारी 2025 पर्यंत होती. मात्र शेतकरी नोंदणीचे प्रमाण विचारात घेऊन खरेदी प्रक्रियेस केंद्र शासनाच्या मान्यतेने प्रथम दि.31 जानेवारी 2025 पर्यंत आणि नंतर दि.06 फेब्रुवारी 2025 पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पणन विभागामार्फत देण्यात आली.
ML/ML/PGB 7 Feb 2025