सोयाबीन खरेदी प्रकरणी विरोधकांचा सभात्याग

मुंबई दि २– राज्यातील सोयाबीनची यंदा विक्रमी खरेदी करण्यात आली मात्र एका शेतकरी कंपनीने काही प्रमाणातील सोयाबीन गोदामात पोहोचवली नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली, या खरेदीसाठी संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, त्यावर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली, त्यानंतर उत्तराने समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला.
राज्यात ५६२ खरेदी केंद्रांवर ५१ हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात आली, त्यांना पाच हजार पाचशे कोटींची रक्कम त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आली आहे अशी माहिती रावल यांनी दिली. मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात उरळ येथील अंदुरा शेतकरी कंपनीने केलेल्या खरेदीत १२९७ क्विंटल सोयाबीनचा फरक आढळून आला, त्यामुळे संबंधित कंपनीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांची ३६ लाख इतकी रक्कम राखून ठेवण्यात आली आहे अशी माहिती रावल यांनी यावेळी दिली.
या प्रकरणी ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना ते देण्यासाठी मार्ग काढून पैसे देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मंत्री म्हणाले. याबाबतचा मूळ प्रश्न दौलत दरोडा यांनी उपस्थित केला होता, त्यावर हेमंत ओगले, रणधीर सावरकर, नाना पटोले, रोहित पवार, कैलास पाटील, जयंत पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने त्याचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. ML/ML/MS