सोयाबीनची वाटचाल ५ हजाराच्या दिशेने, तीन वर्षांनंतर दरात उच्चांकी झेप…

वाशीम दि ७:– वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असून, लवकरच पाच हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४९५० रुपये इतका दर मिळाला असून, हा यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर ठरला आहे. विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांनंतर एवढ्या दराची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर प्रामुख्याने ३५०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यानच राहिले होते. मात्र दरवाढीचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होणार नसल्याचं चित्र आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच आपल्या उत्पादनाची विक्री ४ हजार ते ४३०० रुपयांच्या दरम्यान केली आहे. परिणामी सध्याच्या दरवाढीचा लाभ केवळ माल साठवून ठेवणाऱ्या मोजक्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. मात्र नवीन सोयाबीन विक्रीसाठी येणार तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांना समाधान मिळणार असल्याचं चित्र यावरून दिसून येत आहे. ML/ML/MS