सोयापेंड निर्यातीत 19% घट

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दशकांपासून राज्यातील शेतकरी सोयाबीन लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. सोयाबीन उत्पादक आणि त्यावरील प्रक्रिया युक्त पदार्थ यांमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभाही होत असल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या कृषी वर्षात देशातील सोयाबीन पेंडेंच्या निर्यातीत मोठी घट झाली असून देशांतर्गत मागणी देखील कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ५ महिन्यांच्या काळात देशातून ९ लाख ५० हजार टन सोयापेंड निर्यात झाली. मागील हंगामात याच काळात ११ लाख ७१ हजार टन निर्यात होती. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यात १९ टक्क्यांनी घटली आहे, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हटले आहे.
देशात सोयापेंडचा मुख्य ग्राहक पशुखाद्य उद्योग आहे. मात्र पशुखाद्या उद्योगाची मागणी जवळपास ७ टक्क्यांनी घटली आहे. पशुखाद्य उद्योगाने २७ लाख ५० हजार टनांचा वापर केला. मागच्या हंगामात पहिल्या ५ महिन्यांत पशुखाद्यामध्ये झालेल्या वापराच्या तुलनेत यंदाचा वापर २ लाख टनाने कमी आहे. तर मानवी आहारासाठीही सोयापेंडचा वापर काहीसा कमी झाला. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ३ लाख ६५ हजार टन सोयापेंडचा वापर झाला आहे.सोयाबीन गाळपातून जवळपास ४१ लाख टन सोयापेंडनिर्मिती झाली. सोयापेंड निर्मिती गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी आहे.
मागील हंगामात याच काळात जवळपास ४५ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडला कमी उठाव असल्याने सोयापेंड निर्मितीही कमी आहे, असे सोपाने स्पष्ट केले.
SL/ML/SL
14 March 2025