दक्षिण मुंबईतील घरगल्ल्या होणार मजबूत! दुरुस्तीसाठी पालिकेचा ३ कोटींचा आराखडा
मुंबई, दि २६: दक्षिण मुंबईतील काळबादेवी, चिरा बाजार, चंदनवाडी आदी दाटीवाटीच्या भागांतील घरगल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात या घरगल्ल्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या उपक्रमामुळे जुन्या व अरुंद घरगल्ल्या अधिक मजबूत आणि सुस्थितीत येण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये जागेअभावी मोठ्या प्रमाणात दाट बांधकाम झाले आहे. परिणामी घरगल्ल्यांमध्ये स्वच्छतेच्या व पायाभूत सुविधांच्या समस्या कायम आहेत. गल्ल्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे उंदीर व घुशींचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे लादीकरण, नळजोडणी आदी सुविधा खराब होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने यापूर्वी मोहिमा राबवल्या असल्या तरी कचरा टाकणाऱ्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने कारवाईत अडथळे येत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा केले आहे.
दरम्यान, घरगल्ल्यांचे लादीकरण व इतर आवश्यक दुरुस्ती कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ‘सी’ विभागातील गल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कुंभारवाडा, जुनी हनुमान लेन, बाबू गेनू रोड, अनंतवाडी-फणसवाडी, झावबावाडी, एम. बी. वेलकर स्ट्रीट, डी.एम. लेन, एम. ए. रोड, बारा इमाम रोड, सुतार गल्ली, सिंधी गल्ली, नानुबाई देसाई मार्ग, मटका गल्ली, सिताराम पोतदार मार्ग, धोबी तलाव, दीदी शेठ अग्यारी, केवल क्रॉस लेन, सी.पी. टॅंक, बापू खोटे रोड आणि धसवाडी या भागांचा समावेश आहे.
प्रत्येक गल्लीसाठी अंदाजे ७ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असून एकूण खर्च सुमारे ३ कोटी रुपयांच्या घरात जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. या दुरुस्तीमुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.ML/ML/MS
…….