यंत्रमाग कामगाराचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

ठाणे दि ४– हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भिवंडीतील एका यंत्रमाग कामगाराच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून 41 वा क्रमांक मिळवून न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे.
लहानपणापासूनच संघर्ष हेच जणू त्याच्या आयुष्याचे सूत्र होते. घरची गरिबी, आई-वडिलांचे कष्टमय जीवन आणि शिक्षणाच्या वाटेतील अडथळे यांना न जुमानता त्यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. घरच्या जबाबदाऱ्या, कोर्टातील प्रॅक्टिस आणि अभ्यास यांचा समतोल राखत त्याने दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- 2022 परीक्षेची तयारी करून अपार मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा यशाचा टप्पा गाठला.
परिस्थिती कितीही कठीण असली तरीही ध्येयाशी प्रामाणिक राहून, सातत्य आणि कठोर परिश्रमाने यश मिळवता येते हे भिवंडीतील देवजी नगरमध्ये राहणाऱ्या रमेशने आपल्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. हा विजय केवळ त्यांचा नाही, तर जिद्दीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संघर्ष करणाऱ्या युवकाचा आहे. आता अकरा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर रमेशला त्याची पहिली नेमणूक मिळणार आहे