प्रसिद्ध सोमनाथ धबधबा झाला प्रवाहित, मोठ्या संख्येत पर्यटक दाखल….

चंद्रपूर दि ११:– चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या सोमनाथ येथे शिवमंदिरापाशी असलेला सोमनाथ धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. उत्तम पावसामुळे जा धबधबा प्रवाहित झाल्याने सुट्टीचे दिवस व अन्य दिवसात देखील इथे पर्यटकांची गर्दी आहे. पर्यटकांसाठी एक सुरक्षित वर्षा सहलीचे स्थळ म्हणून इथे मूलभूत सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातून जंगलातून आलेले पाणी खडकांमधून नितळ वाहत असल्याने या भागातील पर्यटकांसाठी हा धबधबा एक पर्वणी ठरतो.
याच धबधबा व शिवमंदिराच्या पुढच्या भागात ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांचा आमटे फार्म नामक मोठा प्रकल्प आहे. एकाच वेळी धार्मिक व सामाजिक पर्यटनासाठी म्हणून नागरिक मोठ्या संख्येने सोमनाथ धबधबा येथे येतात. चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 52 टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला असताना आणि सिंचन प्रकल्प निम्मेच भरले असताना वर्षा सहलीसाठी आवश्यक पर्यटन स्थळांच्या संख्येत घट आली आहे. मात्र असे असतानाही तुलनेने सुरक्षित असलेल्या सोमनाथ येथे पर्यटकांची पावले वळली आहेत. सहकुटुंब पाणी व तुषार यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सोमनाथ धबधबा येथे पोहोचत आहेत.ML/ML/MS