सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस

औरंगाबाद, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी पोलीसांच्या मारहानीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली.
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यावर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे काय करावे? याविषयी कायदा अपूर्ण आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली.
सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणीही त्यांनी केली. ही एसआयटी कोर्टाने नेमावी आणि कोर्टाच्या अधिपत्याखाली ती चालावी. सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात आरोपी हे राज्य सरकार आहे. त्यामुळे प्रकरणात आरोपी असलेले राज्य सरकार त्याच प्रकरणाचा तपास कसा करू शकतो?, असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात केला.
बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण एक सारखे आहे. बदलापुर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याही प्रकरणात तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात केली.
मध्यंतरी सीआयडी ने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत चौकशी केली होती, त्याविषयी बोलतांना ॲड. आंबेडकर म्हणाले की, पुढच्या सुनावणीच्या वेळी सीआयडी ला आरोपी करू.
हायकोर्टकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे आणि 29 एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला सांगितले आहे. या प्रकरणी 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
ML/ML/PGB 8 April 2025