राज्यातील ३७ हजार अंगणवाड्यांमध्ये बसणार सौरऊर्जा संच

 राज्यातील ३७ हजार अंगणवाड्यांमध्ये बसणार सौरऊर्जा संच

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी आता राज्य शासन प्रयत्नशिल आहे मात्र विजेच्या व्यवस्थे अभावी मुलांना आधुनिक उपकरणांच्या मदतीने शिक्षण देण्यात अडथळा येऊ शकतो. यावर आता एक उत्तम निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये विजेची व्यवस्था नसल्यामुळे नाविन्यपूर्ण योजना म्हणून महिला व बालविकास विभागाने ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच बसविण्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्यात आजघडीला ९६ हजार अंगणवाड्या असून १३ हजार मिनी अंगणवाड्या आहेत. यातील १३ हजार अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करून त्यांना यापुढे अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे राज्यात एक लाख १० हजार अंगणवाड्या असतील.

या अंगणवाड्यांमधून शून्य ते सहा वर्षांच्या ५८ लाख बालकांना तसेच सुमारे दहा लाख स्तनदा माता व गर्भवती महिलांना पोषण आहार देण्यात येतो. जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या माध्यमातून बालके व महिलांना पोषण आहार देण्याबरोबरच या बालकांच्या आरोग्य तपासणी व लसीकरणाचे कामही अंगणवाडी सेविकांना करावे लागते. याशिवाय तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे कामही त्यांना करावे लागते.

विजेच्या अभावी सुमारे ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये वीजपुरवठा होत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे, सचिव अनुपकुमार यादव तसेच आयुक्त रुबल अग्रवाल व संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेऊन या सर्व अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंगणवाड्यांसाठी एक किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा संच बसविण्यात येणार आहेत. यासाठी राज्यस्तरावरून ई निविदेच्या माध्यमातून हे सौरऊर्जा संच खरेदी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी संगितले. यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्च उपेक्षित आहे.

SL/KA/SL

18 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *