शिकारपूर सोशल फाऊंडेशन आणि एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, दि १३: सायबर क्षेत्रात नजिकच्या भविष्यात अनेक संधी आणि अभ्युदयाच्या विविध शक्यता आहेत. मात्र, त्यासाठी उच्चशिक्षणाच्या जोडीने विविध ज्ञानशाखांची कौशल्ये, विदेशी भाषांवर प्रभुत्व मिळवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची मानसिकता मिळवा, असे प्रतिपादन सायबर क्राईम क्षेत्रातील महिला तज्ज्ञांनी केले. सायबर क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी आहे, ते लवकरच वाढेल, असा आशावादही या तज्ज्ञांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिकारपूर सोशल फाऊंडेशन आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातर्फे महिला सायबर योद्ध्यांचा आज (दि. १३) गौरव करण्यात आला. १३ फेब्रुवारी हा दिवस स्वातंत्र्यसेनानी, कवयित्री आणि पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या जे. डी. बी. आय. एम. एस. आर. सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायबर कायदेतज्ज्ञ ॲड. वैशाली भागवत, रिस्कप्रोच्या संस्थापक संचालक डॉ. अपूर्वा जोशी आणि पर्सिस्टंट सिस्टिमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिवांगी नाडकर्णी यांचा या वेळी गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या गौरवाचे स्वरूप होते. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज ॲण्ड रिसर्चच्या संचालिका डॉ. रचना शिखरे, शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायबर लॉयर ॲड. वैशाली भागवत म्हणाल्या, नवे तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहेच, पण त्याच्या परिणामांचे नेमके विश्लेषण करता येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध ज्ञानशाखांची कौशल्ये अवगत केली पाहिजेत. यशासाठी कोणताही शॉर्टकट उपयोगी पडत नाही, त्यामुळे परिश्रमांना पर्याय नाही.
फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अपूर्वा जोशी म्हणाल्या, आर्थिक गुन्हेगारीसंदर्भात काम करताना, जोखीम ओळखून उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. आर्थिक गुन्हा कसा झाला, कुणी केला, किती रकमेचा केला..अशा मुद्यांचा वेध घेत, संपूर्ण डाटा तपासून, विश्लेषण करून, वर्गीकरण करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम जोखमीचे असते. आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची सवय आणि सूक्ष्म निरीक्षण, यामुळेही संशोधनाला मदत होते. आपल्या देशात विद्यापीठ स्तरावर आर्थिक गुन्हेगारी या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश अभावानेच दिसतो, याचा उल्लेख त्यांनी केला.
डेटा प्रायव्हसी क्षेत्रातील तज्ज्ञ शिवांगी नाडकर्णी यांनी चौकटीपलीकडे जाणारा विचार करण्याचा सल्ला विद्यार्थिनींना दिला. उत्तम कार्याची प्रेरणा जरूर घ्यावी, पण दुसऱ्यासारखे बनण्याच्या मागे धावू नका, तर तुमची बलस्थाने ओळखून पुढे जा, असे त्या म्हणाल्या.
कम्फर्ट झोन सोडा : डॉ. राजेंद्र डहाळे
डॉ. राजेंद्र डहाळे म्हणाले, आर्थिक आणि सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारीमुळे सुमारे २२ हजार कोटींची मालमत्ता प्रभावित झाली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीविषयी समाजामध्ये प्रभावी जाणीवजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीक, हे सर्वाधिक संख्येने सायबर गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा वापर सजगपणे केला पाहिजे. स्वतःचे कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडले पाहिजे, अन्य ज्ञानशाखांमधील कौशल्ये हस्तगत केली पाहिजेत आणि त्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
विदेशी भाषा आत्मसाद करा : डॉ. दीपक शिकारपूर
डॉ. शिकारपूर म्हणाले, अतिवेगाने होणारे बदल नव्या पिढीसमोर नवे संभ्रम, नवी आव्हाने तसेच नव्या संधींची दारे उघडणारे असतील. ते आपलेसे करण्यासाठी पारंपरिक शिक्षणाच्या जोडीने विविध कौशल्ये, कार्यानुभवाची जोड आपल्या शिक्षणाला द्या. प्रशिक्षण ही आता उद्योगक्षेत्राची जबाबदारी राहिली नसून, प्रत्येक कर्मचारी प्रशिक्षितच असावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे परीक्षांच्या चक्रव्यूहांतून बाहेर पडा, स्टार्टअपचा विचार करा, विदेशी भाषा आत्मसात करा. सायबर क्षेत्रात यापुढेही प्रचंड संधी असणार आहेत. विदेशी भाषा अवगत असल्यास, जग हेच तुमच्या कामाचे ठिकाण बनू शकते, हे लक्षात ठेवा, असा सल्ला शिकारपूर यांनी दिला.
प्रारंभी महर्षी कर्वे यांच्या योगदानाची, कार्याची माहिती देणारी दृकश्राव्यफीत दाखवण्यात आली. क्रांती शहा यांनी सूत्रसंचालन केले तसेच सायबर योद्ध्यांचा परिचय करून दिला. डॉ. रचना शिखरे यांनी आभार मानले.ML/ML/MS