C-DAC कडून शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म’ चे अनावरण
पुणे, दि. ९. (एमएमसी न्यूज नेटवर्क):
प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सी-डॅक आपल्या स्थापनादिनी अर्थात गुढीपाडव्याला शेतकऱ्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन आले आहे. संस्थेकडून आज बदलते हवामान, तापमान, आद्रता, पाऊस, मृदा परीक्षणाच्या सूचना आणि उपयोजनात्मक माहिती देणाऱ्या स्मार्टफार्मचे अनावरण करण्यात आले.पाषाण येथील भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सभागृहात आज ‘सीडॅक’चा ३७वा स्थापना दिवस साजरा झाला.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव भूवनेश कुमार, ‘सीडॅक’चे महासंचालक ई मंगेश आणि मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमातच या प्रणालीचे अनावरण करण्यात आले असून ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी संसाधनांचा वापर करून अधिक कार्यक्षम उत्पादन करण्यास मदत करणार आहे. स्मार्ट शेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवता येते त्यांचा खर्च कमी होतो आणि पर्यावरण सुधारण्यासही मदत होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
स्मार्टफार्ममुळे असा होणार फायदा
तापमान, आद्रता, मृदेतील पोषण मूल्यांचे संवेदकामार्फत नोंदणी
वर्षभराच्या पाण्याचे आणि खतांचे पूर्वनियोजन करता येणार
टच स्क्रीनद्वारे शेतकऱ्यांना उत्तम माहिती मिळणार स्वयंचलित पद्धतीने आणि रिमोट कंट्रोलद्वारे वापरता येणार
मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे माहिती मिळणार
SL/ ML/ SL
9 April 2024