दादर येथील जीव देवशी निवासमध्ये स्लॅब कोसळला, मोठी दुर्घटना टळली
मुंबई, दि २८–
एल आय सी मालकीच्या 90 वर्षांहून अधिक जुन्या दादर येथील जीव देवशी निवास इमारतीत स्लॅब कोसळून दोन महिलांना दुखापत झाली. 19 वर्षांच्या तरुणीच्या खांद्याला मार लागला. मोठी दुर्घटना टळली असली तरी ही घटना इमारतीची धोकादायक अवस्था आणि एलआयसीच्या दीर्घकाळ चाललेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेण्यासारखी आहे.
म्हाडाने या इमारतीला C1 – राहण्यास अत्यंत असुरक्षित असे घोषित केले आहे. अनेक वर्षांपासून रहिवाशांकडून LIC ला सतत पत्रव्यवहार, तक्रारी आणि विनंत्या करण्यात येत आहेत, परंतु LIC ने कोणतीही कायमस्वरूपी मार्ग आणि दीर्घकालीन उपाययोजना केली नाही. उलट फक्त दोन वर्षांपूर्वी इमारतीची सहाव्यांदा वरवरची दुरुस्ती करण्यात आली, जी आज पूर्णपणे अपुरी ठरत आहे. 90 वर्षे जुनी, अत्यंत जीर्ण आणि कमकुवत झालेली ही इमारत आता कधीही मोठ्या दुर्घटनेला सामोरी जाऊ शकते.
सुमारे 80 रहिवासी, तसेच मुंबईतील इतर LIC इमारतींमधील हजारो कुटुंबे अशाच धोकादायक परिस्थितीत राहायला मजबूर आहेत. एल आय सी ने म्हाडाच्या 79A नोटीसना न्यायालयात आव्हान देऊन पुनर्विकासाची प्रक्रियाच थांबवून ठेवली आहे. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम झाला असून, एलआय सीकडून ही अत्यंत बेपर्वाईची भूमिका आहे.
“आमच्या 90 वर्षांहून जुन्या इमारतीची स्थिती किती धोकादायक आहे हे आम्ही वर्षानुवर्षे LIC ला सांगत आलो आहोत. पण LIC ने केवळ तात्पुरत्या दुरुस्त्यांवर वेळ घालवला. आजचा अपघात हा LIC च्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे. आणखी वेळ दवडला तर जीवितहानीची शक्यता नक्कीच वाढेल. LIC ने तात्काळ, कायमस्वरूपी उपाय करणे अत्यावश्यक आहे.”
रहिवासी आणि गृहनिर्माण कार्यकर्ते राज्य व केंद्र सरकारला विनंती करत आहेत की LIC ला तातडीने पुनर्विकास सुरू करण्याचे आदेश द्यावेत किंवा रहिवाशांना सुरक्षित पर्यायी निवास द्यावा. भविष्यात एखादी घटना घडल्यास ती LIC च्या वर्षानुवर्षांच्या निष्क्रिय भूमिकेचीच जबाबदारी असेल.
या घटनेमुळील एल आय सी आणि संबंधित सरकारी यंत्रणांनी लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. आता विलंब न करता ठोस आणि त्वरित कारवाई करणे हा एकमेव मार्ग असल्याची माहिती पगडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS