नायरमध्ये सुरू होणार शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळा
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरला शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्लास्टिक किंवा रबराच्या मॉडेलवर सराव करावा लागतो. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली काम करून शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण घ्यावे लागते. यामुळे शस्त्रक्रियेमध्ये पारंगत होण्यासाठी डॉक्टरांना फार वेळ लागतो. मात्र नायर रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेमुळे (सर्जिकल स्किल लॅबोरेटरी) वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर यांना आता थेट मानवी शरीरावरच शस्त्रक्रियेचा सराव करता येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेची भीती दूर होऊन त्यामध्ये पारंगत होण्यास डॉक्टरांना मदत होणार आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेचा सराव थेट मानवी शरीरावर करण्यासंदर्भात प्रशिक्षण देणारी ही राज्यातील सरकारी रुग्णालयातील पहिली प्रयोगशाळा ठरणार आहे.
वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होणाऱ्यांना एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शरीर रचना शास्त्र शिकविण्यासाठी मृतदेह हातात दिला जातो. त्यानंतर त्यांना पुढील प्रशिक्षण हे प्लास्टिक किंवा रबराच्या मॉडेलवर दिले जाते. शस्त्रविद्येमध्ये मास्टर करणाऱ्या डॉक्टरांनाही प्रत्यक्ष मानवी शरीरावर सराव करता येत नाही. परिणामी शस्त्रक्रियेमध्ये पारंगत होण्यासाठी डॉक्टरांना आपल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. आत्मविश्वास निर्माण होईपर्यंत अशाच प्रकारे सराव करावा लागतो. मात्र नायर रुग्णालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेमुळे राज्यासह देशातील डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे. नायर रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. अमरेश बलियार सिंग यांनी ही प्रयोगशाळा उभारण्याची संकल्पना मांडली. तसेच ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार एका छोट्या खोलीमध्ये प्लास्टिक व रबरवर प्रशिक्षण देणारी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. मात्र आता तिचे स्वरुप व्यापक करत या प्रयोगशाळेमध्ये डॉक्टरांना थेट मानवी मृतदेहावर शस्त्रक्रियेचा सराव करता येणार आहे. नायरमध्ये उभारण्यात येत असलेल्या या अद्ययावत प्रयोगशाळेमध्ये सात टेबल आहेत. गरज पडल्यास हे टेबल १२ पर्यंत वाढवता येतील. यातील एका टेबलावर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर अन्य टेबलवर शिक्षकांच्या माध्यमातून दोन डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे एकावेळी २४ जण हा सराव करू शकतील. तज्ज्ञ डॉक्टरकडून देण्यात येणारे प्रशिक्षण डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या टेबलवर थेट संगणकावर पाहता येणार आहे. हे प्रशिक्षण दोन दिवस असणार आहे. या दोन दिवसांमध्ये डॉक्टरांना मृतदेहावर सर्व बारकावे शिकता येणार आहेत. तसेच हा मृतदेह वर्षभरासाठी वापरण्यात येणार असून, त्याच्या विविध भागावर वारंवार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे सुघटनशल्य विभागाचे प्रमुख डॉ. उदय भट यांनी दिली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन २७ जानेवारीला करण्यात येणार आहे.
मृतदेह जतन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
दान करण्यात येणारे मृतदेह या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत. मृतदेह जतन करण्यासाठी साधारणपणे इंजेक्शनचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे मृतदेह कडक होत असल्याने सराव करताना प्रत्यक्ष मानवी शरीरावर सराव करत असल्याचा भास होत नाही. त्यामुळे मृतदेह जतन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. त्यामध्ये उणे २१ अंश तापमानाला मृतदेह जतन करण्यात येणार आहेत. यामुळे मृतदेहावरील पेशी या सामान्य राहतील.
कोणाला सराव करता येणार
देशातील सर्व रुग्णालयातील डॉक्टरांना या प्रयोगशाळेत प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावता येणार आहे. मात्र त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी वैद्यकीय महाविद्यालय, अधिकृत डॉक्टर संघटना, संस्थांमार्फतच करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर रुग्णालय समितीवर यावर अंतिम निर्णय घेऊन सराव करण्यासाठी परवानगी देईल.
भारतामध्ये शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळा काही खासगी रुग्णालयांमध्ये असून, तेथे दोन दिवसांच्या सरावासाठी डॉक्टरांना ६० ते ७० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. तर परदेशामध्ये याच दोन दिवसांच्या सरावासाठी तीन ते पाच लाख रुपये शुल्क आकारले जाते. मात्र नायर रुग्णालयामध्ये हा सराव फक्त आठ हजार रुपयांमध्ये करता येणार आहे.
पहिल्या दिवसांपासून प्रतिसाद
शस्त्रविद्या कौशल्य प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी सुघटनशल्य विभागाचे प्रशिक्षण असणार आहे. त्यानंतर टाटा रुग्णालयाचे कर्करोगासंदर्भात प्रशिक्षण, त्यानंतर न्यूरो सर्जरी आणि अस्थिव्यंग शल्यचिकित्सा विभागामार्फत सराव प्रशिक्षणाची नोंद झालेली आहे.
ML/KA/PGB
25 Jan. 2023