स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप- आनंद कुमारने जिंकले सुवर्णपदक

भारताच्या आनंद कुमार वेलकुमारने स्केटिंगमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २२ वर्षीय आनंद कुमारने सुवर्णपदक जिंकले. स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
तो पुरुषांच्या वरिष्ठ १००० मीटर स्प्रिंट स्पर्धेत प्रथम आला. आनंदकुमारने १ मिनिट २४.९२४ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले आणि भारताचा पहिला विश्वविजेता स्केटर बनला.
या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आनंद कुमार यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ मध्ये वरिष्ठ पुरुषांच्या १००० मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या आनंद कुमार वेलकुमारचा अभिमान आहे. त्याच्या संयमाने, वेगाने आणि आवडीने त्याला भारताचा पहिला विश्वविजेता बनवले आहे. त्याची कामगिरी असंख्य तरुणांना प्रेरणा देईल. त्याचे अभिनंदन आणि त्याच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”
आनंद कुमार संगणक शास्त्राचे शिक्षण घेत आहे आनंदकुमार वेलकुमार हा तामिळनाडूचा एक तरुण स्पीड स्केटर आहे. १९ जानेवारी २००३ रोजी जन्मलेला आनंदकुमार सध्या चेन्नईतील गिंडी येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये संगणक विज्ञानाचा अभ्यास करत आहे. २०२१ च्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून आणि त्यानंतर २०२२ च्या आशियाई स्पर्धेत ३००० मीटर टीम रिलेमध्ये कांस्यपदक जिंकून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली.