साईबाबांच्या झोळीत दहा दिवसांत सोळा कोटींचे दान
अहमदनगर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे ०८ लाखाहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानने दिली आहे.
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ या काळात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दान पेटीतून ०७,८०,४४,२६५/- रुपये, देणगी काउंटरव्दारे ०३,५३,८८,४७६/- रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी आणि मनी ऑडरव्दारे ०४,२१,४०,८९३/- रुपये अशी एकूण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने ५८६.३७० ग्रॅम (रुपये ३२,४५,२९५/-) आणि चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (रुपये ०७,६७,३४६/-) देणगी प्राप्त झालेली आहे.
अशा प्रकारे विविध माध्यमातून एकुण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
तसेच याकालावधीत श्री साई प्रसादालयात ०६ लाखाहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजाराहून अधिक साईभक्तांनी अन्न पाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११,१०,६०० लाडूप्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून याव्दारे ०१ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्त झालेले आहे. याबरोबरच ७,४६,४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल तसेच श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम आणि विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचे ही संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले.
ML/KA/SL
5 Jan. 2024