इलेक्ट्रिक वाहनांवरील सहा टक्के कर घेतला मागे

 इलेक्ट्रिक वाहनांवरील सहा टक्के कर घेतला मागे

मुंबई दि २६– राज्यात ३० लाख रुपये किंमतीवरील इलेक्ट्रिक वाहनांवर लावण्यात येणाऱ्या ६ टक्के कराचा निर्णय मागे घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली . हा कर लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती, त्यानंतर या संदर्भातलं विधेयक देखील मंजूर करण्यात आलं होतं आता मात्र हा निर्णय मागे घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली.

सरकारच्या आणि मंत्र्यांच्या गाड्या टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनं करण्यात येतील, तसंच आमदारांना वाहन घेण्यासाठी मिळणाऱ्या कर्जाची व्याज सवलत आता केवळ इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठीच मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शहरांमध्ये सर्वाधिक प्रदूषण हे वाहनांमुळे होत असून यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनं हा उत्तम पर्याय असून सध्या ५० टक्के नोंदणी ही इलेक्ट्रिक वाहनांची होत आहे.

२०३० पर्यंत हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत गेल्यास प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे असं त्यांनी सांगितलं. ई वाहनांच्या चार्जिंग साठी मोठ्या पायाभूत सुविधा राज्य सरकार उभारत आहे, पुणे आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प सुरू होत असल्यामुळे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहनांची राष्ट्रीय राजधानी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक वाहनांवर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

एसटीच्या बसेसही पर्यायी इंधनावर आणण्याचा प्रयत्न असून एसटीसाठी पाच हजार बसेस घेण्याचं नियोजन आहे त्यातल्या साडेचारशे गाड्या खरेदी केल्याचं ते म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अडीच हजार इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने घेण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपाच्या उमा खापरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *