विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

मुंबई दि १७– विधानपरिषदेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.भाजपाकडून संजय किणीकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने संजय खोडके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.सहावा उमेदवार म्हणून उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
विधानपरिषदेतले ५ सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं ही निवडणूक होत आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून येत्या २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. विधानसभेत विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं या निवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे मात्र मतदान झाल्यास येत्या २७ तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. येत्या २९ तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. विधान परिषद सदस्य असणारे आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर , रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहेत.