लाडक्या बहिणींना जानेवारीचाही हप्ता मिळण्यास सुरुवात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडकी बहीण योजनेचा फायदा अपात्र महिलांनीही घेतल्याचे आढळून आल्यानंतर या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? असा संभ्रम निर्माण झाला असतानाच राज्यसरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळला आहे. पात्र महिलांच्या खात्यात आज शुक्रवारपासून जानेवारीच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
लाडकी बहिण योजनेचा लाभ अपात्र महिलांनी घेतल्याचे पडताळणीत दिसून आले होते. त्यानंतर या महिलांकडून लाभाची रक्कम परत घेतली जाईल अथवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यसरकार कोणाकडूनही लाभाची रक्कम परत घेणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. त्यावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापूर्वीच पात्र महिलांच्या खात्यांमध्ये जमा होईल, असा शब्द महिला – बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिला होता.
त्यानुसार शुक्रवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली. थेट बँक हस्तांतरण पद्धतीने अर्थात डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. त्याबाबतचा मेसेज महिलांच्या मोबाईलवर येत आहे. मेसेज आला नाही तर बँकेच्या एपमध्ये जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शनवर क्लीक करुन खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे चेक करता येणार आहे. बँकेत जाऊनही याबाबतची माहिती मिळू शकेल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर
२१०० रुपये हप्ता मिळणार
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरुन २१०० रुपये केला जाईल, अशी माहिती महिला – बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली होती. योजनेचा हप्ता वाढविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढीव खर्चाची तरतूद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळणार आहे.
ML/ML/SL
24 Jan. 2025