सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका….

वाशीम दि ९:– वाशीमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान येथील सिंचन तलावाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून तलावाची भिंत खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश जलस्त्रोतांनी पातळी गाठली आहे. मात्र पिंपरी हनुमान धरणाच्या भिंतीवरील दोन्ही बाजूंची माती वाहून गेली असून मध्यभागी फक्त तीन फूट जागा शिल्लक आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हा तलाव केव्हाही फुटू शकतो. अशा परिस्थितीत परिसरातील सुमारे २०० एकर शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे उभे पीक आणि पाण्याच्या प्रवाहातील घरे, रस्ते यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. गावकऱ्यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला कळविले आहे. तलावाची संपूर्ण भिंत फुटण्यापूर्वीच मजबुतीकरणाचे काम करून मोठा अनर्थ टाळावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.ML/ML/MS