आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : शांततेसाठी पोषक संस्कृती रुजवण्याची गरज

 आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : शांततेसाठी पोषक संस्कृती रुजवण्याची गरज

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. १९८१ साली संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता, त्याला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि योगायोगानं यंदाच जगात दोन मोठी युद्धे आणि १०० पेक्षा अधिक छोटे मोठे संघर्ष सुरु आहेत. जगात शांतता निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे, मात्र त्या दिशेने हवी तशी ठोस कृती केली जात नाही. त्याच पार्श्वभूमीवर, जगात शांततेची संस्कृती विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

आज युरोपात युक्रेन- रशिया युद्धाला जवळपास दीड वर्ष होऊन गेलं आहे, तर पश्चिम आशियात इस्राएल आणि हमास मधला संघर्ष संपण्याची काहीही चिन्हं दिसत नाहीत उलट आता आजूबाजूचे देश त्यात ओढले जात असल्यानं, सगळ्या पश्चिम आशियावर युद्धाचं सावट आहे. चर्चेतून दोन्ही संघर्षांवर तोडगा निघावा, असा विचार तत्त्वतः जरी मान्य होत असला, तरी त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने, बोलणी पुढे सरकत नाहीत. ही संघर्षाची स्थिती, इतर देशांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम घडवत असते. जगाची व्यवस्था बिघडवत असते.
भारतानंही शांततेला प्राधान्य देत, चर्चेसाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

मात्र, ही झाली संघर्षाची, तणावाची स्थिती. शांतता दिवसात, यापेक्षा अधिक व्यापक अपेक्षा आहेत. शांतता म्हणजे, युद्धजन्य स्थिती नाही, तर, त्यात एक सकारात्मक, गतिमान प्रगतीही अपेक्षित आहे. अशी पोषक परिस्थिती, ज्यात परस्पर सामंजस्य आणि सहकार्यातून चर्चा करणे सुलभ होईल. यात प्रत्येक जीवाप्रती आदर, मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा सन्मान ठेवणे, शिक्षण, संस्कार आणि सहकार्यातून अहिंसक मनोवृत्ती वाढवणे, स्वातंत्र्य, समता, लोकशाही मूल्यांचा सन्मान करत, ते अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

आज तंत्रज्ञानाचे वेगाने प्रगती होत असतांना, युद्धाचेही नवनवीन प्रकार समोर येत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहेत. युद्धातली नैतिकता संपून गेली आहे. अशावेळी, तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यालाही मर्यादा येऊ शकतात, त्यामुळे गैरवापराचा धोका असतोच. अशावेळी मूल्यावरची निष्ठा, माणुसकी, संस्कृती सन्मान अशा गोष्टींवर भर द्यायला हवा. अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच, शांतता, अहिंसेचे शिक्षण द्यायला हवे.

मात्र दुर्दैवाने सध्या सगळीकडे अत्यंत विपरीत परिस्थिती आहे. अमेरिकेसारख्या देशात शाळकरी मुली सर्रास बंदुका घेऊन फिरतात, अंधाधुंद गोळीबार करतात, तर युरोपात स्थलांतरित निर्वासितांच्या हिंसक कारवाया चिंतेचे विषय ठरल्या आहेत. आशियात चीनचे विस्तारवादी धोरण, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, म्यानमार मधे उद्भवत असलेली परिस्थिती, अशा सगळ्या घटना विचार करायला लावणाऱ्या आहेत. देशा देशात वर्चस्वासाठी स्पर्धा, अविश्वास पूर्वीही होता. मात्र त्यात आता अत्यंत भयंकर विध्वंसक शस्त्रांची भर पडली आहे. जी पृथ्वीच्या भवितव्य, अस्तित्वासाठी पण धोकादायक आहे. सगळं जग self destructive मनःस्थितीत आहे. अशावेळी शांततेच्या संदेशाची नितांत आवश्यकता आहे. आपलं अस्तित्व आज त्यावर अवलंबून आहे.

जगातील सकारात्मक शांततामय वातावरणच पुढच्या पिढीसाठी काहीतरी भविष्य ठेवू शकते. माणसाने आता जवळपास सगळी भौतिक सुखे मिळवली आहेत. अशावेळी, आता लोभ बाजूला ठेवून परस्पर सहकार्य, शांततेला महत्त्व देण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांसह सर्व आंतरराष्ट्रिय संस्थांनी, सर्व मोठ्या, लहान देशांनी आणि सर्व लोकांनीही जागतिक शांतता ही आपली संस्कृती बनवावी, ही काळाची गरज आहे.

ML/ML/PGB 21 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *