‘द राईट साईन’ मोहिमेतून सांकेतिक भाषेला मिळतोय रॅपचा साथ

मुंबई दि.9(एम एमसी न्यूज नेटवर्क):
भारतातील सर्वात मोठ्या स्थानिक भाषा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म व्हर्से इनोव्हेशनने सायनिंग हँड्स फाउंडेशन, वॉन्डरलब आणि ल्युसिफर म्युझिक यांच्या सहकार्याने ‘द राईट साईन’ या नाविन्यपूर्ण मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा उद्देश भारतीय सांकेतिक भाषा (ISL) सामान्य जनजीवनात आणण्याचा असून, कर्णबधिर व ऐकू येणाऱ्या समाजामधील संवादातील अडथळे दूर करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमांतर्गत भारतातील नामवंत रॅपर्स इंदीप बक्षी, व्ही-टाउन क्रॉनिकल्स, एन्कोर आणि यश बर्वे यांनी त्यांचे लोकप्रिय म्युझिक व्हिडीओ पुन्हा सादर केले असून त्यात पारंपरिक ‘गँग साईन्स’ ऐवजी ISL मधील अर्थपूर्ण हावभावांचा समावेश केला आहे. ‘अलोन’, ‘फ्लेक्स’, ‘ढलता चाँद’ आणि ‘जो देखे वो लिखे’ यांसारख्या गाण्यांतून त्यांनी सांकेतिक भाषेचा प्रभावी वापर केला आहे.
या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 40 ठराविक वाक्यांशांचा एक ट्युटोरियल व्हिडीओ, जो तरुण कलाकार व रॅपर्सना ISL शिकण्यासाठी प्रोत्साहित करतो. यामुळे सांकेतिक भाषा हा केवळ कर्णबधिर समाजापुरता मर्यादित न राहता मुख्य प्रवाहातील संवादाचा भाग होऊ शकतो, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
व्हर्से इनोव्हेशनचे मुख्य विपणन अधिकारी समीर वोरा म्हणाले, “ही केवळ एक मोहीम नसून सांस्कृतिक प्रभाव वापरून सर्वसमावेशकतेचा प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही भाषा पॉप कल्चरमध्ये सामावून घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.”
सायनिंग हँड्स फाउंडेशनचे संस्थापक व सीईओ आलोक केजरीवाल म्हणाले, “सांकेतिक भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, ती ओळख, संस्कृती आणि हक्कांचं प्रतीक आहे. ‘द राईट साईन’ ही मोहीम या भाषेची ओळख सामान्य समाजात करून देण्याचे काम करत आहे.”
वॉन्डरलबचे सह-संस्थापक अमित अकाली म्हणाले, “भारतीय तरुणांमध्ये गँग साईन्सचे अनुकरण दिसून येते. या साईन्सना अर्थपूर्ण व उपयोगी सांकेतिक भाषेत रूपांतरित केल्यास ते शिक्षणाचं साधन बनू शकतं. म्हणूनच आम्ही रॅप या माध्यमाची निवड केली.”
ल्युसिफर म्युझिक, एन्कोर आणि व्ही-टाउन क्रॉनिकल्स या कलाकारांनी ISL शिकण्याचा अनुभव शेअर करत सांगितले की, ही भाषा शिकताना त्यांनी संगीताच्या माध्यमातून एक नवीन, भावनिक पातळी गाठली आहे.
व्हर्से ही एक भारतातील डिजिटल तंत्रज्ञान कंपनी आहे जी स्थानिक भाषांमध्ये कंटेंट पोहोचवण्याचे काम करते. त्यांच्या ‘Dailyhunt’ आणि ‘Josh’ या अॅप्सद्वारे दररोज ३५० दशलक्षांहून अधिक लोकांपर्यंत मजकूर पोहोचतो. त्यांनी गुगल, मायक्रोसॉफ्ट, कॅटरामान, ओमिद्यार नेटवर्क यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक आकर्षित केली आहे.
ML/ML/SL
10 April 2025