कर्नाळ्यात दुर्मिळ ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’ चे दर्शन
पनवेल, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध प्रजातीच्या पक्षांचे नंदनवन असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे पहिल्यांदाच दुर्मिळ अशा ” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” या पक्षाचे दर्शन झाले आहे.
पक्षीनिरीक्षकांना कर्नाळा अभयारण्य परिसरात हा पक्षी आढळून आला. कोकिळेच्या या दुर्मीळ प्रजातीच्या पक्षाचे दर्शन होण्याची ही महाराष्ट्रातील तिसरीच नोंद असून कर्नाळा अभयारण्य परिसरात पक्षी प्रथमच नोंदवण्यात आला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे हिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षी येथे येत असतात. या मध्ये दुर्मिळ पक्षांचा देखील समावेश असतो.
पक्षीनिरीक्षक प्रशांत श्रीवास्तव कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी आले होते. अभयारण्यातील एका तलावाच्या नजीक सकाळी ११:३० च्या दरम्यान एका काळ्या पक्ष्याची हालचाल त्यांना आढळून आली. त्या पक्ष्याचे फोटो काढून त्याचे निरीक्षण केले असता तो ” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” असल्याची माहिती श्रीवास्तव यांना समजली. तर कर्नाळ्यात या पक्ष्याचे प्रथमच दर्शन झाल्याची माहिती स्थानिक पक्षीनिरीक्षक सागर म्हात्रे यांनी दिली.
” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” हा प्रामुख्याने आग्नेय आशिया आणि हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात आढळून येतो. या प्रदेशात हा पक्षी आपली वीण करत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली. श्रीलंकेमध्ये त्याचे हिवाळी स्थलांतर होते. हे स्थलांतर तो प्रामुख्याने पूर्व घाटाच्या प्रदेशामधून करतो. त्यामुळे त्याचे दर्शन दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, महाराष्ट्रातून या पक्ष्याची नोंदी असून कर्नाळ्यातील ही नोंद राज्यातील तिसरीच नोंद असल्याचे त्यांनी नमूद केले. हा पक्षी भरकटलेल्या अवस्थेत कर्नाळ्यात आल्याचा अंदाज सागर म्हात्रे यांनी व्यक्त केला.
” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” ची महाराष्ट्रातील पहिली नोंद १९९९ साली सायन येथे अभ्यासक आदेश शिवकर यांनी स्वतः केली होती.
यावेळी हा पक्षी त्यांना जखमी अवस्थेत सापडला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने शिवकर यांनी या पक्ष्याचे मृत शरीर ” बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ” ला सुपूर्द केले होते.तर दुसरी नोंद अमरावतीतील मेळघाट मध्ये २०१३ साली झाली होती. ” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” हा वटवट्या प्रजातींमधील पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालतो. या पक्ष्याचा वरील भाग चकचकीत गडद , काळे डोके, लांब काळी शेपटी आणि लालसर तपकिरी मान असते.
ML/KA/SL
1 Jan. 2023