शुभमन गिलचा विश्वविक्रम, रेकॉर्डब्रेक द्विशतक
राजकोट, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारत- न्यूझिलॅंड दरम्यान झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने 149चेंडूत 208 धावांचा डोंगर उभारून विश्वविक्रम केला. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, त्याने वयाच्या २४ व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते.
आजच्या या धुवाधार खेळी बरोबरच शुभमनने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. आपल्या दमदार खेळीत गिलने 19 चौकार आणि 9 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट 140 च्या आसपास होता. शुभमन गिलने पहिल्या पन्नास धावांसाठी 52 चेंडू खेळले. यानंतर 87 चेंडूत शतक पूर्ण केले. गिलने 122 चेंडूत 150 धावा केल्या आणि नंतर सलग तीन षटकार मारत 145 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. शुभमन गिल हा न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1999 साली 186 धावांची इनिंग खेळली होती आणि आता गिल त्याच्या पुढे गेला आहे.
शुभमन हा वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी फक्त रोहित शर्मा, ईशान किशन, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडेत न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या.
SL/KA/SL
18 Jan. 2023