सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे यांचे निधन

नागपूर दि २८– सुप्रसिद्ध लेखिका,ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगीताई भडभडे यांचे आज सकाळी नागपूर येथे निधन झाले. वयाची ८० वर्षं पूर्ण झाल्यानंतरही नित्य लेखन करणाऱ्या शुभांगीताई खऱ्या अर्थाने साहित्यसाधक होत्या.
८० कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, वैचारिक,स्फुट असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
चरित्रात्मक कादंबरी ही त्यांची विशेष ओळख. शुभांगीताई साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही होत्या. वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी पद्मगंधा प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी केले. अनेक नव्या लेखिकाना लिहिते केले. काल संध्याकाळी डॉ भारतीताई सुदामे यांच्या ‘ मी आर्यपुत्र’ या अनुवादित कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या उपस्थित होत्या.
अलीकडे प्रकाशित झालेली त्यांची कादंबरी “ राजयोग ( स्वयंसेवक ते प्रधानसेवक एक दैदीप्यमान यात्रा )
ही कादंबरी प्रत्यक्ष मोदींना भेटून त्यांनी त्यांना दिली हे विशेष. बकुळीची फुलं ही कादंबरी त्यांनी त्यांच्या जीवनावर लिहिली. त्यांनी त्यांचा पूर्ण प्रवास त्यात लिहिला आहे. नुकत्याच महाकवी कालिदास जीवन गौरव पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या होत्या. ML/ML/MS