विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्व, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जाधव

 विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्व, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जाधव

मुंबई, दि २८:

मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार, क्रांतिकारी अशी बाबासाहेबांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्यांना नवा उच्चार आणि नवा उदगार बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला. लोकमनाला आवाहन करण्याची क्षमता त्याच्या भाषेत होती.
विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रिय लेखनाचे प्राणतत्त्व होय, असे प्रतिपादन राजकीय पत्रकार, लेखक श्रीकांत जाधव यांनी येथे केले. ‘डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत पत्रकारिता’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही बोरिवली पूर्व येथील हनुमान टेकडी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ४४८ व महिला मंडळ आणि प्रबुद्ध सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास मालिकेत १२ वे पुष्प रविवारी २८ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांत जाधव बोलत होते. कार्यक्रमास अध्यक्ष सचित कांबळे, चिटणीस नितीन शिर्के, नाता जाधव, प्रशांत जाधव, विजया जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

भावी उन्नती व तिचे मार्ग याची खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यासाठी वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही, अशी धारणा बाबासाहेबांची होती. मूक समाजाला बोलत करण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत,
जनता, प्रबुद्धभारत ही वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केली. मूकनायक ते प्रबुद्धभारत हा डॉ. आंबेडकर यांचा वृत्तपत्रीय प्रवास म्हणजे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा प्रवास आहे. आजच्या काळातही या वृत्तपत्रांचे अन्यसाधारण महत्व आहे. तत्कालीन शोषित समाजस्थितीशी झुकते माप न घेता, समाजस्थिती बदल्याची प्रतिज्ञाच जणू या वृत्तपत्रांनी केली होती. म्हणूनच बाबासाहेबांना त्याची वृत्तपत्रीय भाषा अलंकाराने किंवा शब्दांच्या लडींनी जाणीवपूर्वक खुलवण्याची गरज भासली नसावी. विचारगर्भ लेखनाला कृतीची गरज भासत नाही. बाबासाहेबांचा मानस आणि ध्येयवाद सर्वच लेखनातून प्रतिबिंबीत होतो, असेही श्रीकांत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिशरण,पंचशील आणि बुद्धधम्म ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *