कोट्यावधी हिंदूंचे आदर्श श्रीराम
भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात मर्यादा पुरुषोत्तम अशी ओळख असलेल्या आणि श्री विष्णूचा सातवा अवतार म्हणून भगवान श्रीरामाच्या जन्मा प्रित्यर्थ श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात भारतभर साजरा केला जातो. कौटुंबिक जीवनात एखाद्या व्यक्तीने कसे आदर्श जीवन जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण आणि आदर्श म्हणून भारतीय समाजात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची मनोभावे पूजा केली जाते. भगवान श्रीरामाचे जीवन हे कोट्यावधी हिंदूंचे आदर्श आहे, त्यामुळेच पदोपदी श्रीरामाच्या जीवनातील दाखले दिले जातात.
चैत्रशुद्ध नवमीच्या दिवशी पुष्य नक्षत्रावर माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी माध्यावर पाच ग्रह असताना अयोध्या येथे भगवान श्रीरामचंद्राचा जन्म झाला. कोणतीही देवता व अवतार यांच्या जन्मतिथिला त्यांचे तत्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीरामनवमीला श्रीरामतत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असते. श्रीरामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते, असेही मानले गेले.
देशभरातील जवळपास सर्व मंदिरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव अविरत चालतो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून रामनवमी उत्सवाची सुरुवात करण्यात येते. पाडवा पहाटने वातावरण शुद्ध होते. प्रभू गीतांनी मने शुद्ध होतात, नंतर नऊ दिवस म्हणजेच श्रीराम जन्मापर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन असते. या दरम्यान ठीक ठिकाणी रामनामाचे पारायण, गीत रामायण, कथा, कीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार करून हा उत्सव साजरा होत असतो. रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्माच्या किर्तनाने रामाचा जन्म आपण सर्वसाधारण करतो. अनेक ठिकाणी बाळरामाची मूर्ती किंवा नारळाला वस्त्रामध्ये गुंडाळून हे नारळ पाळण्यात ठेवून भगिनी पाळणा हलवतात. भक्तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळून राम जन्माचा जयघोष करीन मनोभावे पूजा करतात. रामनवमीच्या प्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे सुंठवडा असतो. महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित्र मानस लिहिण्यास सुरुवात केली होती.
श्रीरामासारखे उज्वल चरित्र जगाच्या इतिहासात दुसरे कोणतेच नाही, हे त्रिवार सत्य आहे. ईश्वराचा राम हा अवतार म्हणजे समाजमनाची दृढ श्रद्धा आहे. रामाचे आचार, रामाचे विचार आणि रामाचे वर्तन असे होते की, राम सर्वांना आदर्श माणूसच वाटत असे. असामान्य, अलौकिक आणि कर्तुत्वान व्यक्ति म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या जीवनात राम होण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, नाहीतर आज मुह में राम और बगल में छुरी असेच दिसते. रामाचा प्रत्येक गुण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे.
आपल्या नंतर आयोध्येचा उत्तराधिकारी कुणाला करायचे असा विचार राजा दशरथ करीत असताना आयोध्येतील प्रजेने रामाला राजा करण्याचा आग्रह धरला होता. राम खूपच लोकप्रिय होते आणि प्रजेचे भरपूर प्रेम त्याना मिळत होते, मात्र माता कैकयीने भगवान रामाला सांगितले की आयोध्याच्या गादीवर भरताला बसवावे आणि तू चौदा वर्षे वनवासात जावे, अशी महाराजांची
इच्छा आहे. दशरथ राजांचा हा निर्णय ऐकल्यानंतर रामाच्या चेहऱ्यावर कोणती दुःख या भाव नव्हते. श्रीरामाने चौदा वर्षे वनवासात जाण्याचा निर्णय घेतला.
राम वनवासात जाणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण अयोध्या नगरी त्यांच्यासोबत जाण्यास निघाली होती. लक्ष्मण तर रडत होते. या सर्वांची समजूत काढता काढता राम थकून गेले. तुमचे खरोखरच माझ्यावर प्रेम असेल तर माघारी फिरा. मला पितृ वचनाचे पालन करू द्या, अशी विनंती रामाने केली, तरीही प्रजा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रजेचे स्वार्थरहीत प्रेम मिळविण्याचे काम श्रीरामासारखी अलौकिक व्यक्तीच करू शकते. जगामध्ये अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत आणि पुढे होतील परंतु राम राज्याचा काळ लोटून हजारो वर्षे झाली तरी रामाचे विस्मरण संस्कृती उपासकांना झाले नाही. यातच भगवान श्रीरामाचे श्रेष्ठत्वाचे गमक आहे.
रामाने एवढी वर्ष वनवासात काढली अशी कल्पना करताना देखील आजही भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. कर्तव्यनिष्ठा हेच भगवान श्रीरामाच्या जीवनाचे प्रमुख ध्येय होते. राम देव होता म्हणून वाल्मिकी ऋषींनी रामाचे चरित्र चित्रण केले नाही. अनेक आपत्ती सहन करून दुःख भोगून देवत्व मिळवलेली व्यक्ती म्हणजेच श्रीराम असे त्यात त्यानी म्हटले आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हा कोट्यावधी भाविकांचा आवडता देव असल्याने रामनवमीच्या दिवशी लोक व्रत ठेवतात. हे व्रत ठेवण्याच्या अनेक पद्धती आहे. अनेक लोक व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटवून श्रीरामाचे नामस्मरण करतात, त्यानंतर दुसरे दिवशी चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्म मुहूर्ताला उठून घर स्वच्छ करतात आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घेतात त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र केली जातात. घरादारावर आंब्याचे तोरण लावले जाते.
नागपूरातील सर्वच राममंदीरातर्फे श्रीराम जन्मोत्सव दरवर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. गेल्या 50 वर्षापासून पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम नवमीच्या दिवशी रामनगर येथील राम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदा शोभायात्रेचे 48 वे वर्ष आहे. महाराष्ट्राचे युवा, तडफदार व लोकप्रिय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक वर्षापासून या शोभायात्रेचे आधारस्तंभ आहे. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून, विद्यार्थी परिषदे काम करीत असताना, या नंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे वार्ड अध्यक्ष, संत्रा नगरीचे
सर्वात युवा महापौर, 92 ते 97 असे सलग दोन वेळा नगरसेवक, 1999 पासून सलग पाच वेळा आमदार, नंतर महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्याचे युवा मुख्यमंत्री तर आता उपमुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा चढता आलेख असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी रामनवमीच्या शोभायात्रेत आपला सहभाग कधीही चुकू दिला नाही या ईश्वरी कार्यायात ते नेहमीच आमच्या सोबत असतात.
नागपूरचे सुपुत्र, नागपूरची वेगळी ओळख निर्माण करणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचाही सहभाग या शोभा यात्रेच्या निमित्ताने नेहमीच राहत आलेला आहे. रामभक्त माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार विलासभाऊ मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, सुप्रसिध्द अॅडव्होकेट आनंद परचुरे यांचे सहकार्य व पाठींबा यासोबतच अनेक कार्यकर्त्यांच्या हाताने हा रथ अविरत पुढे पुढे जात आहे, हीच प्रभू श्रीराम रायाची कृपा म्हणावी लागेल.
लेखक- डॉ. प्रविण महाजन, रामभक्त आणि जलतज्ज्ञ