आराध्य दैवत बिरोबा श्री विठ्ठल बिरदेव यात्रा सुरू
कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भंडारा, खारीक, खोबरं, लोकर यांच्या उधळणीत, बिरोबाच्या नावानं चांगलभलंच्या गजरात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र पट्टणकोडोली इथं श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस काल उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-कैताळाच्या निनादात फरांडेबाबांनी ऐतिहासिक हेडाम सोहळ्याचं दर्शन घडविलं.
भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक पट्टणकोडोलीत दाखल झाले होते.
दुपारी दोनच्या सुमारास मुख्य धार्मिक विधीस प्रारंभ झाला.
गावचावडीत मुख्य मानकरी प्रकाश पाटील आणि रणजित पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचं पूजन केलं. दुपारी तीन वाजता श्री फरांडेबाबा हातात तलवार
घेऊन उभे राहिले. पोटावर तलवारीने वार करत फरांडेबाबा हेडाम खेळत मंदिराची प्रदक्षिणा घालत मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली.
फरांडेबाबांची भाकणूक
देशाची समान नागरिक कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल, भारताची महासत्तेकडे वाटचाल होईल, राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल, देवाची सेवा करील त्याची रोगराई दूर होईल, नऊ दिवसांत पावसाचे कावड
फिरेल, पाऊस काल चांगला राहील, धारणा चढती राहील, महागाई वाढेल,अशी भाकणूक फरांडेबाबा यांनी केली.
फरांडेबाबा हेडाम नृत्य करत पोटावर तलवारीचे वार करत मंदिरात गेले.दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाकणूक कथन केली.
यावेळी परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या होत्या. हुपरी पोलिस ठाण्याकडून यात्रेच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ML/ML/PGB 22 Oct 2024