श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, प्रभू वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी…

बीड दि २८– बारा जोतिर्लिंगांपैकी असलेलं बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथ मंदिर पाचव्या क्रमांकावर येतं. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त प्रभू वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आले असल्याने भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, त्यामुळे संपूर्ण वातावरणात भक्तीमय चैतन्य भरले होते.
मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध फुलांच्या माध्यमातून सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात १३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक त्या सोयीसुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी सेवाभावी संस्थांकडून भाविकांसाठी पाणी आणि महाप्रसादाची सोयही करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि आराधना विशेष फलदायी मानली जाते. त्यातही श्रावणी सोमवारी शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूरवरून येतात. परळी येथील वैजनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे या ठिकाणाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळेच, पहिल्या श्रावणी सोमवारी येथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी होते. ML/ML/MS