शिवसेना उबाठा युवनेत्याच्या घरून सापडला काडतुसांचा साठा

 शिवसेना उबाठा युवनेत्याच्या घरून सापडला काडतुसांचा साठा

चंद्रपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. घरी 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी शहरातील इंदिरानगर भागातील सहारे याच्या घरात 4 तास शोध अभियान राबविण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र आणि हत्यार विरोधी विशेष अभियान आरंभले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रें विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली. धाडीत एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत.

सहारे याच्यासह शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. विक्रांत सहारे आणि कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन तसेच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे.

उबाठा गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख या पदावर असलेल्या विक्रांत सहारे याच्यावरील मोठ्या कारवाईने जिल्ह्यातील दहशतीच्या नेटवर्कविरोधातील नेमका मार्ग पोलिसांना सापडल्याची चर्चा आहे.

ML/ML/PGB
3 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *